पश्चिम बंगालमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली होती. तिला पोटात दुखण्याची तक्रार असल्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगतिलेल्या माहितीवरून तिला मोठा धक्काच बसला. डॉक्टरांनी तपासानंतर तिला पुरूषांना होणारा कर्करोग झाल्याची माहिती दिली. तेव्हाच तिला आपण महिला नसून पुरुष असल्याचं समजलं आणि मोठा धक्काच बसला.

अचानक महिलेच्या पोटाच्या खालील भागात दुखू लागल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तपासणीनंतर ती महिला नसून पुरूष असल्याची माहिती समोर आली. यावेळी तिला कर्करोगाचंही निदान झालं. कोलकात्यामधील नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या पतीलाही मोठा धक्का बसला. तपासादरम्यान त्या महिलेला अँड्रोजेन इन्सेसटिव्हीटी सिंड्रोम नावाता एक आजार असल्याचं समोर आलं. डॉ. अनुपम दत्ता आणि जॉ. सौमन दास यांनी केलेल्या तपासणी नंतर ही बाब समोर आली.

“दिसण्यासाठी ती सामान्य महिलेप्रमाणेच आहे. परंतु जन्मापासूनच तिच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय नाही. असा प्रकार सामान्यत: दिसत नाही आणि २२ हजार लोकांमधून एखाद्यामध्ये हा आजार दिसून येतो,” असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. सध्या महिलेवर कर्करोगाचे उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली. या संपूर्ण प्रकारानंतर महिलेच्या पतीलाही धक्का बसला असून डॉक्टरांकडून त्याचं कौन्सिलिंग सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, महिलेच्या बहिणालाही हा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.