मुलगा शेजारच्या घरात राहणाऱ्या मुलीसोबत पळून गेला त्याची शिक्षा मुलाच्या आईला देण्यात आली. संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईचे एका अपंग माणसासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले. बिहारच्या दरभंगामधील एका गावात ही धक्कादायक घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पळून गेलेल्या जोडप्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आईच्या कपाळावर जबरदस्तीने कुंकू लावले व एका अपंग व्यक्तीच्या गळयात हार घालायला लावला. त्यांनी या महिलेचे मुंडणही केले. महिलेच्या मुलाने आपल्या घरातील मुलीला पळवून नेले, म्हणून बदला घेण्याच्या हेतूने त्यांनी हे सर्व केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

१४ नोव्हेंबरला ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. घरातून पळून गेलेल्या या जोडप्याला अजूनही पोलिसांना शोधता आलेले नाही. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जबरदस्तीने लग्न लावण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यासाठी सायबर सेलला सांगण्यात आले आहे.

“१४ नोव्हेंबरला ही घटना घडली. महिलेचे केस कापण्यात आले व तिला लग्नाचे विधी करण्यास भाग पाडण्यात आले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात मुलीच्या १५ नातेवाईकांविरोधात तक्रार नोंदवली. दोन्ही कुटुंब शेजारी राहतात” असे पोलीस अधिकारी दिलीप कुमार झा यांनी सांगितले. दोन्ही कुटुंबांच्या घराजवळ आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman forced to marry man as revenge for her son eloping with girl dmp
First published on: 24-11-2020 at 13:30 IST