राजधानी दिल्लीत एसयूव्ही कारमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद विहार येथील मॉलजवळ मंगळवारी रात्री एसयूव्ही कारमध्ये तिघांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एसयूव्ही कार जप्त करण्यात आली आहे. अन्य दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पिडीत महिला तीन आरोपींपैकी एकाला अमितला मागच्या काही महिन्यांपासून ओळखत होती. घरासाठी कर्जाचे काम करुन देण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला मॉलजवळ बोलवले होते. पिडीत महिला ओळखीच्या एका व्यक्तीसह त्या ठिकाणी गेली. तिच्याबरोबर आलेली व्यक्ती दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यानंतर पिडीत महिला एकटीच होती असे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
कर्जाच्या कामासाठी तुम्हाला माझ्यासोबत गाडीमधून यावे लागेल असे अमितने त्या महिलेला सांगितले. ती महिला गाडीत बसल्यानंतर तिने पिण्यासाठी पाणी मागितले. अमितने दिलेल्या बाटलीतून पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखे वाटू लागले. चक्कर आली. गाडी थोडया अतंरावर गेल्यानंतर धनपाल आणि धर्मेश हे दोघे सुद्धा गाडीत बसले.
काही वेळ त्यांनी आनंद विहारच्या भागात गाडी फिरवली. त्यानंतर त्यांनी मॉलजवळ गाडी पार्क करुन सामूहिक बलात्कार केला असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याबद्दल कुठे वाच्यात केली तर जीवे मारण्याची धमकी तिला आरोपींनी दिली. कशीबशी या महिलेने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली व पीसीआर फोन करुन बलात्काराची माहिती दिली. आरोपींना घटनास्थळावरुनच ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 2:35 pm