उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी असलेल्या सेक्टर ३९ मधून एका महिलेला मेट्रोतून खेचून कारमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला. या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. याबाबत ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

नोएडा या ठिकाणी असलेल्या ‘गोल्फ कोर्स’ मेट्रो स्टेशनवर पीडित महिला मेट्रोची वाट पाहात उभी होती. मेट्रो आल्यावर ती त्यामध्ये चढणार इतक्यात काही नराधम तिथे आले त्यांनी तिला उचलले आणि स्कॉर्पियो कारमध्ये बळजबरीने बसवले. त्यानंतर याच धावत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गाझियाबादमध्ये नर्सवर बलात्कार

नोएडामधील ही घटना समोर आली असतानाच तिकडे गाझियाबादमध्येही एका परिचारिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील सिहानी गेट भागात रात्री ९.३० च्या सुमारास एक नर्स आपल्या घरी चालली होती. तेव्हा काही नराधमांनी तिला पकडले, तिला लुटले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. आता या नराधमांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

देशातील महिलांची सुरक्षा हा मुद्दा अत्यंत चिंतेचा आहे. सरकारकडून, पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र वास्तव काहीतरी निराळेच असते. या दोन घटना महिलांची सुरक्षा कशा रितीने वाऱ्यावर सोडण्यात आली आहे हेच अधोरेखित करणाऱ्या आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी दोन्ही घटनांमधील पीडित तरूणींनी केली आहे.