एक महिला रेल्वेतून आपल्या मुलांसह प्रवास करत होती. त्यावेळी तिने जेवण मागवले. हे जेवणाचे पाकिट उघडताच तिला त्यात अळ्या दिसून आल्या. या जेवणात अळ्या जिवंत होत्या, महिलेने आणि तिच्या मुलांनी या संदर्भात तातडीने तक्रार केली. मात्र २०१६ मध्ये केलेल्या या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. अखेर दोन वर्षांनी ग्राहक न्यायालयाने या महिलेला १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. शालिनी जैन असे या महिलेचे नाव आहे.

शालिनी जैन या ३ जुलै २०१६ रोजी चंदीगढहून दिल्लीला शताब्दी एक्स्प्रेसने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती. शालिनी जैन यांनी २७० रुपये देऊन जेवण मागवले होते. मात्र या जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर जैन यांनी रेल्वेमंत्र्यांना ही बाब तातडीने ट्विट करून कळवली होती. तसेच याबाबत तक्रारही केली होती. मात्र त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. अखेर ग्राहक न्यायालयात हे सगळे प्रकरण गेले. ग्राहक न्यायालयाने जैन यांना १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना जे जेवण पुरवले जाते ते पुरवताना त्याची किंमत घेतली जाते. मात्र या जेवणाच्या स्वच्छतेची आणि दर्जाची काळजी घेतली जात नाही यासंदर्भात शालिनी जैन यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना दोन वर्षांनी याची भरपाई मिळणार आहे.