आंदोलन करताना चेहऱ्यावरचा बुरखा काढला म्हणून एका महिलेला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शपर्क शजारिझादेह असे या महिलेचे नाव असून ती इराणी महिला आहे. ४२ वर्षीय शपर्क शजारिझादेहला आता आपल्या आयुष्यातली २० वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका आंदोलनादरम्यान तेहरान या ठिकाणी ही महिला बुरखा काढून आंदोलन करत होती. त्याचसाठी तिला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुरखा किंवा हिजाबची सक्ती नको असे म्हणत तिने आवाज उठवला होता.

आपले आंदोलन करताना तिने एक पांढरा झेंडा फडकावत बुरखा किंवा हिजाबची सक्ती नको अशी मागणी केली होती. मात्र हे आंदोलन करताना तिने चेहऱ्यावरचा बुरखा हटवला त्याचमुळे तिला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात जामिनावर तिला सोडण्यात आले. मात्र तिच्यावर भ्रष्टाचार आणि वेश्या व्यवसाय केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या घटनेबद्दल इराणी अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आपल्याला २० वर्षांची शिक्षा झाल्याचे या महिलेने स्वतःच्या वेबसाईटवरच सांगितले आहे. ‘डेली मेल’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यात शपर्क शजारिझादेह या महिलने आंदोलन केले होते. या आंदोलनात तिने महिलांना वस्त्र परिधान करण्याचे स्वातंत्र्य द्या असे म्हणत आंदोलन केले. मात्र याच आंदोलनासाठी तिला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.