‘व्हॉट्सअॅप’वर सौदी अरेबियातील एका इसमाची बदनामी केल्याबद्दल ३२ वर्षांच्या महिलेला ७० फटके आणि सुमारे ५ हजार अमेरिकी डॉलर्सचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तक्रारकर्त्यांची प्रतिष्ठा डागाळल्याच्या आरोपाखाली पूर्व सौदी अरेबियातील एका फौजदारी न्यायालयाने या महिलेला दोषी ठरवले. या गुन्ह्य़ासाठी तिला ७० फटके आणि २० हजार सौदी रियाल (५३३२ अमेरिकन डॉलर्स) दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावल्याचे वृत्त ‘ओकाझ’ वृत्तपत्राने दिले आहे.
तक्रारकर्त्यांचा या महिलेशी वाद झाल्यानंतर त्याने न्यायालयात खटला दाखल केला. आपण या इसमाचा अपमान केल्याचे महिलेने मान्य केले, असे ‘गल्फ न्यूज’ने सांगितले. सौदी अरेबियाच्या सायबर गुन्हेविरोधी कायद्यानुसार, कुणी माहिती तंत्रज्ञानाच्या कुठल्याही माध्यमातून एखाद्याची बदनामी केल्यास त्याला एक वर्षांपर्यंतची कैद व ५ लाख रियालपर्यंतचा दंड किंवा यापैकी एक अशा शिक्षेची तरतूद आहे.