वेगवेगळ्या धर्माच्या एका तरुणाला आणि एका महिलेला बेंगळुरूमध्ये दोन बदमाशांनी त्रास देत शिवीगाळ केल्याचं समोर आलंय. या दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यापूर्वी आरोपी दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मायको लेआउट पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बेंगळुरूच्या डेअरी सर्कलजवळ ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओंमध्ये बदमाश या दोघांना शिवीगाळ करताना, मारहाण करत त्यांचा छळ करताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनाही दुचाकीवरून खाली उतरण्यास भाग पाडण्यात आलं.

“तुला अशाप्रकारे दुसऱ्या धर्माच्या माणसाबरोबर फिरताना लाज वाटत नाही का? आपण कोणत्या काळात जगत आहोत हे माहित नाही का? ” असं एक आरोपी महिलेला म्हणतोय. तसेच “तू तुझ्या समाजातील एका महिलेला बाईकवर अशाप्रकारे नेण्याची हिम्मत करू शकतोस का,” असंही या आरोपींनी तरुणाला विचारल्यास व्हिडिओत ऐकू येतंय. व्हिडिओमध्ये ती महिला विवाहित असल्याचं सांगत आहे. तसेच ती दुसऱ्या पुरुषासोबत दुचाकीवरून येत आहे, हे तिच्या पतीला माहित असल्याचं ती सांगते. त्यानंतर आरोपी महिलेकडून जबरदस्तीने तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेताना दिसतात. एका आरोपीने व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टूडेला दिली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर ईशान्य बेंगळुरू विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी निवेदन जारी केलंय. ते म्हणाले, “दोन वेगवेगळ्या धर्माच्या दोन व्यक्तींनी सोबत प्रवास केल्यानंतर त्यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सुद्दागुंटेपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्वरित कारवाई करत १२ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे.”

दरम्यान, हे प्रकरण चांगलेच गाजले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच प्रकरणी त्वरीत कारवाई करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. “वेगळ्या धर्माच्या महिलेसोबत प्रवास केल्याबद्दल दुचाकीस्वाराला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आमचं सरकार अशी प्रकरणं खपवून घेणार नाही,” असंही मुख्यमंत्री बोम्मई यांनी रविवारी ट्विट करून म्हटलंय.