दिल्लीच्या गुरुग्राम शहरात सहकुटुंब डिनरसाठी गेलेल्या एका कुटुंबाला धक्कादायक अनुभव आला. यावेळी हॉटेलमध्ये आलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महिलेला त्रास दिला व तिच्या पतीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. रविवारी रात्री ही घटना घडली. तक्रारदार मूळचा हिस्सारचा असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. १५ वर्षांपूर्वी तो गुरुग्रामला आला आणि आता साऊथ सिटी-२ मध्ये कुटुंबासोबत राहतो.

सोहना रोडवर सेक्टर ४७ मधील हॉटेलमध्ये तो पत्नी, मुलगा, भाऊ आणि त्याच्या पत्नीसोबत रविवारी रात्री डिनरसाठी गेला होता. हे कुटुंब हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बसले होते. त्यांच्या पुढच्याच टेबलावर काही जण दारु पित बसले होते. त्यातल्या एकाने माझ्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट केली. ज्यावेळी मी त्याला याबद्दल जाब विचारला तेव्हा त्याने आम्हाला धमकावले असे तक्रारदाराने सांगितले.

तक्रारदाराने आरोपींना आपल्या टेबलावर जाऊन बसण्यास सांगितले. पण त्यांनी नकार देत शिवीगाळ सुरु ठेवली तेव्हा त्या कुटुंबाने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे कुटुंब बाहेर पडत होते. त्यावेळी एकाने बिअर बाटली तक्रारदाराच्या डोक्यात फोडली. या घटनेमध्ये तक्रारदारासोबत असलेला त्याचा मुलगाही जखमी झाला.

सादर पोलीस स्थानकात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण झाले आहे. फुटेजमध्ये एकजण महिलेबद्दल अश्लील कमेंट करताना व तक्रारदाराला धमकावताना दिसतो. आम्ही एफआयआर नोंदवला असून कोणालाही अटक केलेली नाही. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.