28 September 2020

News Flash

‘तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे’, प्रेयसीच्या मेसेजनंतर आठव्या मजल्यावरुन ढकलून पत्नीची हत्या

करवा चौथच्या रात्री इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली ढकलून देत महिलेची हत्या करण्यात आली

प्रियकराच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय शेफाली तिवारी या महिलेला अटक केली आहे. शेफाली तिवारीने प्रियकरासोबत मिळून त्याच्या पत्नीच्या हत्येचा कट आखला होता. 27 ऑक्टोबरला करवा चौथच्या रात्री इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली ढकलून देत महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी शेफाली तिवारीला अटक केली आहे.

दीपिका चव्हाण असं मृत महिलेचं नाव असून त्या एका बँकेत काम करत होत्या. बाल्कनीतून खाली पडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. दीपिका यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तिचा पती विक्रम सिंह चौहान याला अटक केली होती. दीपिकाला पतीचे शेफालीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती. यावरुनच तिने विक्रमला जाब विचारला होता. शेफाली त्यांच्या शेजारीच राहत होती. शेफाली सहा महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपास केला असता पोलिसांना या हत्येमध्ये शेफालीचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली. गुगल टॉक आणि व्हॉट्सअॅपवरील दोघांमधील संवाद पाहिला असता हा शांत डोक्याने रचण्यात आलेला कट असल्याचं समोर आलं. या संभाषणामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आणि शेफालीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या हत्येच्या दोन तासांआधी शेफालीने विक्रमला गुगल टॉकवर एक मेसेज पाठवला होता. विक्रमने आपली पत्नी भांडणादरम्यान जोरजोरात ओरडत असल्याची तक्रार शेफालीकडे केली होती. यावर शेफालीने ‘तिला बाल्कनीतून खाली ढकलून दे’ असं उत्तर पाठवलं. बरोबर नऊ मिनिटांनी विक्रमने, ‘मला असंच करायचं आहे…ती खूप जोरजोरात ओरडत आहे’ असं उत्तर पाठवलं. यावर शेफालीने ‘मग करुन टाक’ अशी प्रतिक्रिया दिली.

त्यादिवशी शेफालीने विक्रमला अजून एक मेसेज पाठवला होता ज्यामध्ये आतापर्यंत तू तिला ढकललं असशील असं वाटलं होतं मला असं उपहासात्मक लिहिलं होतं.

तपासादरम्यान दोघांनीही वेगळ्या नावाने जीमेलवर खातं सुरु केलं होतं, आणि त्याद्वारे चॅट करत असल्याचं समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आपली ओळख लपवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांमधील संभाषण तपासलं असता विक्रमने याआधीही नैनीताल येथे दीपिकाच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मात्र त्यावेळी त्याला अपयश आलं.

‘विक्रम 24 ऑक्टोबर रोजी पत्नीला कड्यावरुन ढकलण्याच्या उद्देशाने नैनीतालला घेऊन गेला होता. 26 ऑक्टोबरला शेफालीला पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याने आपण हे करु शकलो नसल्याची कबुली दिली होती. तब्बेत बरी नसल्याने ती उंच ठिकाणी जाणार नाही याची आपल्याला कल्पना आल्याने करु शकलो नाही असं त्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दीपिकाला उंच ठिकाणी भीती वाटायची असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नैनीतालमध्ये पत्नीची हत्या करु न शकल्याने शेफाली विक्रमला चिडवू लागली होती. लुजर म्हणत नैनीतालमध्ये 10 दिवस राहूनही पत्नीची हत्या करु न शकल्याने शेफाली विक्रमवर चिडली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघेही 2017 पासून एकमेकांच्या संबंधात होते. कॉलनीच्या पार्कमध्ये त्यांची भेट झाली होती. एप्रिल महिन्यात दोघेही लेह लदाखला पाच दिवस फिरण्यासाठी गेले होते. विक्रमच्या पाकिटात चित्रपटाची दोन तिकीटं सापडल्य़ानंतर दीपिकाला त्यांच्यामधील संबंधाची माहिती मिळाली होती’. दरम्यान आरोपी शेफालीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 11:40 am

Web Title: woman held for conspiring to kill lovers wife gurugram
Next Stories
1 दुर्घटनेतून कधी शिकणार?, पंजाबमध्ये छट पूजेसाठीही स्थानिक रेल्वे ट्रॅकवर जमले
2 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणतात काश्मीरबद्दल आफ्रिदी म्हणतो ते योग्यच!
3 देशाची प्रगती होणार असेल तर १२५ कोटी भारतीयांचे नाव ‘राम’च ठेवा: हार्दिक पटेल
Just Now!
X