एआयएडीएमके पक्षाचा झेंडा लावलेला खांब चुकवत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एका ३० वर्षीय दुचाकीस्वार महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे. तामिळनाडूत कोईमबतोरमध्ये सोमवारी सकाळी हा दुर्देवी अपघात घडला. अनुराधा राजेश्वरी असे जखमी महिलेचे नाव आहे. अनुराधाचे दोन्ही पाय ट्रकच्या चाकाखाली आले. स्थानिक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिला दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

राजेश्वरीने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे. ती ऑफीसला जात असताना हा अपघात घडला. राजेश्वरी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून पालक तिच्यावर अवलंबून आहेत असे नातेवाईकांनी सांगितले. अनुराधाच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकने रस्त्यावरील आणखी एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका व्यक्तीला हाताला आणि गुडघ्याला मार लागला आहे.

सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारच्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर जनतेमधून मोठया प्रमाणावर रोष व्यक्त झाला होता. चेन्नईमध्ये स्थानिक एआयएडीएमकेच्या नेत्याचे होर्डिंग अंगावर पडल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला होता.

कोईमबतोरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांच्या स्वागताचे अविनासी हायवे वर होर्डिंग लावण्यात आले होते. पोलीस आता प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राजेश्वरीच्या कुटुंबाने एनडीटीव्हीशी बोलताना केला.