एका बुरखाधारी मुस्लिम महिलेने इमामाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेन्नईच्या त्रिप्लीकेन भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांना अद्यापपर्यंत आरोपी महिलेला अटक करता आलेली नाही. आगीत होरपळल्यामुळे इमामाचा मृत्यू झाला आहे. सय्यद फझरुद्दीन (६०) असे मृत इमामाचे नाव आहे. त्रिप्लीकेन भागात मशिदीसमोरच फझरुद्दीन यांचे कार्यालय आहे.

आरोपी बुरखाधारी महिला रात्री आठच्या सुमारास सय्यद फझरुद्दीन यांच्या कार्यालयात गेली. तिने तिच्याजवळ असणारे केमिकल त्यांच्या अंगावर फेकले व त्यांना पेटवून दिले. त्यानतंर या महिलेने लगेच तिथून पळ काढला. स्थानिक नागरिक इमाम फझरुद्दीन यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे दोन तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी महिलेने पळ काढल्यानंतर मणी यांनी पाठलाग करुन तिला पकडण्याचा प्रयत्न केला. ६१ वर्षीय मणी यांचे याच परिसरात दुकान असून इमाम फझरुद्दीन त्यांचे जवळचे मित्र होते. मणी यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेली हत्या आहे. महिला पायी पळाली असली तरी तिच्यासाठी जवळपास कुठेतरी गाडी थांबलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांना इमाम फझरुद्दीन यांच्या शरीरामध्ये पेट्रोल किंवा केरोसीनचे घटक सापडले नाहीत. सापडलेले नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.