मुलांना ऑनलाईन कोचिंगसाठी नवीन मोबाईल घेऊन देण्यावरुन पतीशी झालेल्या भांडणामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. ज्योती मिश्रा असं या महिलेचं नाव असून बुधवारी तिने स्वतःवर केरोसिन ओतून घेत पेटवून दिलं. या अपघातात ज्योती ९० टक्के भाजली होती, अखेरीस गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान ज्योतीने अखेरचा श्वास घेतला.

आपल्या मुलांच्या ऑनलाईन कोचिंगसाठी नवीन मोबाईल घ्या यासाठी ज्योती आणि तिचा पती प्रमोद मिश्रा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. प्रमोदने आपल्या पत्नीला थोडे दिवस वाट पाहण्याची विनंती केली. बुधवारी याच मुद्द्यावरुन ज्योती आणि प्रमोद यांच्यात भांडणं झालं, ज्यावरुन रागावलेल्या ज्योतीने स्वतःवर केरोसिन ओतून घेत पेटवून दिलं. यानंतर प्रमोदने शेजारच्यांच्या मदतीने आपल्या पत्नीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. मात्र गुरुवारी सकाळी ज्योतीने अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांना दिलेल्या जबानीत ज्योतीने, पतीशी झालेल्या भांडणामुळे आपण हे कृत्य केल्याचं सांगतिलं. सात वर्षांपूर्वी ज्योती आणि प्रमोद यांचं लग्न झालं होतं, त्यांना दोन मुलंही आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ज्योतीचा भाऊ, शेजारी आणि पती प्रमोद मिश्रा यांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे.