केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक होऊन त्यात एक माओवादी महिला ठार झाली, तर एकजण जखमी झाला आहे. इतर आठजणांना अटक करण्यात आली आहे. तिलेतांड वसाहतीत ही कारवाई करण्यात आली, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिलेतांड वसाहतीत माओवादी दोन कोटींची खंडणी एका कंपनीकडून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे तेथे कोब्रा बटालियनच्या चार कंपन्या पाठवण्यात आल्या. त्यावेळी माओवाद्यांशी रात्री चकमक झाली. त्यात एक माओवादी महिला ठार झाली, असे बिहार-झारखंडचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक अरुण कुमार यांनी सांगितले. माओवाद्यांशी चकमक अजूनही सुरूच आहे.
त्यांच्याकडे वॉकीटॉकी, इन्सास रायफल व दारुगोळा सापडला. पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यात भाकप (माओवादी)चे मगध रांगे, सचिव उपेंद्र बैठा ऊर्फ संजीवन यांचा समावेश आहे.