वयात आलेल्या प्रत्येक मुलामुलीच्या मागे त्यांचे पालक लग्नाचा तगादा लावतात. अनेकदा मुलांना आई-वडिलांच्या हट्टामुळे इच्छा नसतानाही लग्नाच्या बोहल्यावर चढवे लागते. मात्र ही समस्या फक्त आपल्याकडेच नसून परदेशातही असेच चित्र दिसते. यावरच उपाय म्हणून युगांडामधील एक तरुणीने स्वत:शीच लग्न करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने घरच्यांवर सूड उगवला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापिठाची विद्यार्थिनी असलेल्या लूलू जेमिमा या ३२ वर्षीय तरुणीने २७ ऑगस्ट रोजी स्वत:शीच लग्न केले. ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये तिने वेडींग गाऊन परिधान करण्यापासून ते सर्वच प्रथा पार पाडल्या. यावेळी उपस्थित असलेल्या पाहुण्यांना या लग्नाची संकल्पनाही समजून सांगितली. त्यावेळी तिने या लग्नात नवरा मुलगा का नाही यासंदर्भातले स्पष्टिकरणही दिले.

आई-बाबांनी लग्न करण्याचा तगादा लावल्याने स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या लूलूच्या लग्नाला तिचे आई-बाबा उपस्थित नव्हते. तरी तिने फोन करुन या लग्नाची संकल्पना आपल्या आईला समजवून सांगितली. दुसऱ्या दिवशी मी आईशी बोलले तेव्हा ती गोंधळलेली होती. मात्र मी सर्व प्रथांचे पालन करुनच लग्न केल्याचे तिला सांगितल्याची माहिती लूलूने डेली मेलशी बोलताना दिली. माझ्या बाबांना अजूनही या लग्नाबद्दल कशापद्धतीने व्यक्त व्हावे हे समजत नसल्याचेही तिने सांगितले.

स्वत:चीच लग्न करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना लूलूने गो फाऊण्ड मी साईटवर एक ब्लॉगही लिहीला आहे. मी १६ वर्षांची झाली त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या लग्न समारंभासाठीचे भाषण लिहीले. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आई माझ्यासाठी प्रार्थना करते. मागील काही वर्षांपासून ती तिच्या प्रार्थनेमध्ये माझ्या मुलीची काळजी घेणारा चांगला नवरा तिला मिळू दे अशी मागणीही देवाकडे करायची. म्हणूनच त्यांची काळजी संपवण्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला. आणि माझ्या ३२ व्या वाढदिवशी माझी काळजी घेऊ शकणाऱ्या व्यक्तीशी विवाह केला. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी या निर्णयाशी ठाम राहण्याचा मी निश्चय केला आहे असंही तिने यावेळी स्पष्ट केले.

तिच्या लग्नाचा खर्च केवळ काही शे रुपये इतकाच आला. म्हणजे घरापासून लग्न समारंभ पार पडला त्या ठिकाणी जाण्यासाठी तिने खर्च केलेले २.६२ डॉलर इतकाच खर्च झाला. या लग्नासाठीचा वेडिंग गाऊन लूलूच्या मित्रैणीने तिला वाढदिवसाची भेट म्हणून दिला होता. तिच्या भावाने लग्नसमारंभासाठी केकचा खर्च केला. तर ज्या हॉटेलमध्ये लग्न झाले तेथे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची स्वत:चे बील स्वत: भरले. त्यामुळे पाहुण्यांचा खर्चही लूलूला करावा लागला नाही.