बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका महिला अधिकाऱ्याची गेस्ट हाऊसच्या मालकाने गोळी घालून हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक मजूरही जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर धरमपूर भागात असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात तोडक कारवाई सुरु झाली. या कारवाईच्या वेळी नारायणी गेस्ट हाऊसचा काही भाग तोडण्यात आला. या गोष्टीचा राग डोक्यात ठेवून गेस्ट हाऊसचा मालक विजय कुमार याने हवेत गोळीबार केला. यातली एक गोळी महिला अधिकारी शैला बाला शर्मा यांना लागली. तर दुसरी गोळी मजूर गुलाब सिंह याला लागली. महिला अधिकारी शैला बाला शर्मा यांचा गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गेस्ट हाऊसचा मालक विजय कुमार पळाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या गोळीबारात वीज विभागाचे उप प्रकल्प अधिकारी संजय नेगी यांचा जीव थोडक्यात वाचला. जिल्हा प्रशासनाने कसौली भागात असलेल्या १३ हॉटेल्स आणि रेस्तराँच्या बेकायदा बांधकामांवर हतोडा चालवला. या कारवाईची पाहणी करत असतानाच शैला बाला शर्मा यांच्यावर गोळी झाडण्यात आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दुःख व्यक्त केल आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.