अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले. तेथे त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
हा आपल्यासाठी मोठा सन्मान असून या आदरातिथ्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ओबामा यांनी सांगितले.
ओबामा यांना विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने मानवंदना दिली. मुखर्जी यांनी ओबामांची ओळख मंत्री व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी करून दिली. या वेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू, ऊर्जामंत्री पीयूष गोयल व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग उपस्थित होते.
मिशेल यांना बनारसी साडी
बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना आताच्या भारत दौऱ्यात येथील विणकरांनी तीन महिने परिश्रम करून हाताने विणलेली बनारसी रेशमी साडी नजराणा म्हणून दिली जाणार आहे, या साडीला ‘कधुआ साडी’ असे म्हटले जाते. हाताने विणलेल्या साडीत सोन्याचे व चांदीचे धागे विणलेले असतात. साडीचे वजन ४०० ग्रॅम असून किंमत दीड लाख रुपये आहे.
अब्दुल मटिन यांचे कुटुंब तीन पिढय़ा साडय़ा विणण्याचा व्यवसाय करते आहे. मिशेल यांचे बनारसी साडीचे आकर्षण आम्हाला माहीत आहे, असे सांगून मटिन म्हणाले की, भारतीय वंशाचे अमेरिकी फ्रँक इस्लाम या ओबामा यांच्या विश्वासू व्यक्तीने या साडीची मागणी नोंदवली होती. इस्लाम हे आझमगड येथे जन्मलेले असून त्यांना अलीकडेच मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर हा पुरस्कार मिळाला होता. ते भारतात आलेल्या अमेरिकी शिष्टमंडळात आहेत.
कधुआ रेशमी साडी ही फार दुर्मीळ असते व हाताने विणण्यास तीन-चार महिने लागतात. वाराणसीच्या रेशमी साडी विणकरांची संघटना असलेल्या वाराणसी वस्त्र उद्योग संघाने नवी दिल्लीला १०० साडय़ा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार यांच्याकडे पाठवल्या असून त्याही मिशेल ओबामा यांना दिल्या जाणार आहे.

बराक ओबामा यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाटावर पुष्पांजली वाहिली. गांधीजींची अिहसेची व शांततेची विचारसरणी म्हणजे जगाला मोठी देणगी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना या वेळी चरख्याची प्रतिकृती भेट देण्यात आली.मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जे म्हणाले होते ते आजही सत्य आहे. गांधीजींची शिकवण आजही भारतात कायम आहे, जगाला ती मोठी देणगी आहे. जगातील सर्व लोक व देशांना प्रेम व शांततेच्या वातावरणात राहण्याची संधी मिळावी अशीच अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रपती भवनावरील स्वागतानंतर ओबामा थेट राजघाटावर गेले.

ओबामांसाठी शाही खाना
बराक ओबामा यांच्यासाठी शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही पदार्थाचा समावेश मेन्यूत करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरचे नद्रू के गुलार ते पश्चिम बंगालचे माही सरसो हे पदार्थ त्यांना दुपारच्या जेवणात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानार्थ शाही भोजन ठेवले होते. हैदराबाद हाऊस येथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू होते. सूपमध्ये शतवार (शतावरी-अ‍ॅस्परागस) का शोरबा या सूपचा समावेश होता, गोड पदार्थात गुलाब जाम व गाजर का हलवा व फळांचा समावेश होता.
 
एक नूर आदमी दस नूर कपडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोशाखाच्या शैलीची नेहमी प्रशंसा केली जाते. आजही अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या विमानतळावरील स्वागतप्रसंगी त्यांनी पारंपरिक कुर्ता पायजमा परिधान केला होता. तसेच सोनेरी व लाल रंगाचे उपरणे गळ्याभोवती दिसत होते. ओबामा यांनी उद्योगपती परिधान करतात तसा काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्यांची पत्नी मिशेल यांनी निळा व काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. मोदी यांनी नंतर राष्ट्रपती भवनात बंद गळा सूट परिधान केला होता. त्यांच्या पोशाखाची अमेरिकेतील वृत्तपत्रांतही त्या वेळी खूप चर्चा झाली .

पूजा ठाकूर यांना बहुमान
मी प्रथम अधिकारी आहे व नंतर महिला आहे, हे उद्गार आहेत विंग कमांडर पूजा ठाकूर यांचे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत करताना त्यांना इंटर सव्‍‌र्हिसेस गार्डच्या दलाने सलामी दिली, त्यात पूजा ठाकूर यांनी नेतृत्व केले. हे पथक भारतीय हवाई दलाच्या इंटर सव्‍‌र्हिसेस गार्ड्सचे होते. त्यांनी ओबामा यांना सलामी दिली. महिलांसाठी सैन्यात काम करणे किती अवघड असते, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की त्यात काही अवघड नाही. आम्ही प्रथम अधिकारी आहोत, मग पुरुष किंवा स्त्री आहोत. आम्ही सारखेच आहोत, आमचे प्रशिक्षणही सारखेच आहे, आम्ही समान आहोत. ठाकूर या इ.स. २००० मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या. त्या प्रशासकीय शाखेत काम करीत होत्या. नंतर त्यांची नियुक्ती ‘दिशा’ या प्रशासन सेवेत झाली. तुम्ही बराक ओबामा यांना सलामी देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करीत आहात, हे ऐकून आईवडिलांना काय वाटले, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की त्यांना अभिमान वाटला.