हरियाणामधील पलवल येथे राहाणाऱ्या एका स्त्रीने पूर्वाश्रमीतील प्रियकरावर सूड उगविण्यासाठी त्याच्या हत्येचा कट रचला होता. राकेश नावाच्या या प्रियकराचे घर बॉम्बने उडवून देण्याची योजना तिने आखली होती. यासाठी तिने तीन बॉम्बची निर्मितीदेखील केली होती. आरती नावाच्या या स्त्रीने तिच्या पूर्वाश्रमीतल्या अन्य एका प्रियकराच्या मदतीने ही योजना आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या तपासात त्यांच्याकडे तीन बॉम्ब सापडले, नंतर ते निकामी करण्यात आले. या बॉम्बमध्ये फटाक्यांत वापरात येणारी दारू, नखे, कांचांचे तुकडे आणि दगडांचा वापर करण्यात आला होता. एका खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी आरती आणि प्रदीपला ताब्यात घेतले असता चैकशीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला.
शमशाबाद येथील आरतीच्या एका मित्राच्या घरी बॉम्ब लपविल्याची माहिती चैकशीदरम्यान आरती आणि प्रदीपने दिली. बॉम्ब सामानात लपविण्यात आल्याने आरतीच्या मित्राला बॉम्बविषयी काहीच समजले नाही. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्यांना ग्रेनेडप्रमाणे दिसणारे तीन बॉम्ब सापडले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी पालिसांना तीन ते चार तासांचा अवधी लागला.
राकेश आणि आरतीची २०१० मध्ये भेट झाली होती. त्यानंतर राकेश बायको आणि तीन मुलांना सोडून आरतीसोबत राहायला लागला होता. सहा वर्षे आरतीसोबत राहिल्यानंतर राकेशने कुटुंबियांकडे परतण्याचा निर्णय घेतला. राकेशला कुटुंबियांकडे परतण्याच्या कामी बाबूलाल नावाच्या त्याच्या मित्राने मदत केली. आपले प्रेमसंबंध तुटण्यामागे बाबूलालच जबाबदार असल्याची आरतीची धारणा झाली. प्रदीपच्या मदतीने तिने बाबूलालची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना हत्येच्या ठिकाणी धर्मपाल नावाचा बाबूलालचा मित्र बेशुध्द अवस्थेत सापडला होता. धर्मपालने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाबूलालच्या हत्येप्रकरणी आरती आणि प्रदीपला ताब्यात घेतले. आपणच बाबूलालची हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांच्या चौकशीदरम्यान कबुल केले. धर्मपाल आणि बाबूलालला दारूत झोपेच्या गोळ्या देऊन त्यांना बेशुध्द करून, नंतर बाबूलालचा गळा चिरून दोघे फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राकेशला ठार मारण्यासाठी तीन बॉम्ब बनविल्याची माहिती चौकशीदरम्यान आरतीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. राकेशच्या घरात बॉम्ब फेकून त्याला ठार मारण्याची तिची योजना होती.