तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणी महिला आणि मुलींच्या अधिकारांबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणी महिलांवर अत्याचाराच्या अनेक बातम्या समोर येत असताना अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून समोर आलेला फोटो हा कित्येक अफगाणी महिलांसह जगभरातील महिलांसाठी प्रेरणा देणारा आहे. स्वतःचे वैयक्तिक अधिकार आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिला तालिबानविरोधात निर्भीडपणे उभ्या राहत आहेत. या महिला अफगाणिस्तानच्या अनेक शहरांमध्ये तालिबानविरोधात लढत आहेत. हेच सांगणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं म्हणत काही लोकांनी काबुलमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ जमून घोषणाबाजी केली होती. याच निदर्शनादरम्यान काबूलच्या रस्त्यावर हा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोमध्ये एका तालिबान्याने हिजाब घातलेल्या एका महिला निदर्शकाकडे बंदूक ताणलेली दिसत आहे. बंदूक ताणलेली असूनही ती महिला हिमतीनं त्या तालिबान्यासमोर उभी असल्याचं दिसतंय. रॉयटर्सच्या पत्रकाराने काढलेला हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बंदुक ताणून उभा असलेल्या तालिबान्यासमोर हिमतीनं उभी अफगाणी महिला..(फोटो सौजन्य – रॉयटर्स)

अफगाणिस्तानातील महिला तालिबानच्या सत्तेनंतर स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत. दरम्यान, तालिबानने सोमवारी अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत ताब्यात घेतला. यानंतर, अनेक पुरुष आणि स्त्रियांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आणि पाकिस्तानवर हल्ला करा, अशी घोषणाबाजी केली. पाकिस्तानी जेट विमानांनी पंजशीर प्रांतात हवाई हल्ले केले असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला होता. या आंदोलकांना पांगवण्यासाठी तालिबान सदस्यांनी हवेत गोळीबार केला होता. मात्र तरीही हे आंदोलन सुरू असल्याचं माध्यमांनी म्हटलंय.