एका महिलेला चालत्या कारमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज असून तामिळनाडूमधील कोईम्बतूरमधील घटना आहे. व्हिडीओतील महिलेने आपल्या पती आणि सासू-सासऱ्यांनी हत्या करण्याच्या हेतूने चालत्या कारमधून ढकलल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ गेल्या महिन्यातील आहे. आरती अरुण असं या पीडित महिलेचं नाव आहे.

नव्याने संसाराची सुरुवात करण्यासाठी आपल्या दोन मुलांसोबत आरती अरुण पतीसोबत एकत्र राहू लागल्या होत्या. पती घरगुती हिंसाचार करत असल्याने आरती अरुण वेगळ्या झाल्या होत्या. इंजिनिअर असणाऱ्या पती अरुण अमलराजविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेलं नाही. अरुण आपल्या आई-वडिलांसोबत गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता आहे.

२००८ मध्ये अरुण आणि आरती यांचं लग्न झालं होतं. रोज होणाऱ्या भांडणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सहा वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. २०१४ मध्ये आरती आपल्या आई-वडिलांकडे निघून गेल्या होत्या. आरती यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सोबतच घऱगुती हिंसाचाराची केसही दाखल केली होती. पण पतीने केलेल्या विनंतीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचं ठरवलं होतं.

इतकंच नाही तर मे महिन्यात दोघे कुटुंबासोबत ऊटीला गेले होते. पण यावेळी पुन्हा एकदा पतीने हिंसाचार करण्यास सुरुवात केल्याचा आरती यांचा आरोप आहे. त्यांनी ऊटी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. पण लिखीत माफी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाऊ दिलं होतं.

पण कोईम्बतूरला गेल्यानंतर पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली. आई-वडिलांपासून लांब राहण्याचं आश्वासन देऊनही अरुण यांनी त्यांना आपल्यासोबत कारमधून आणल्याने वाद सुरु झाला. आरती यांनी जाब विचारला असता त्यांना चालत्या कारमधून ढकलून देण्यात आलं. त्यांच्या हाताला, खांद्याला आणि गुडघ्याला जखम झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.