एका तरुणीने झोपेत असताना तिची साखरपुड्याची अंगठी गिळली. तिला वाटलं तेव्हा हे लक्षातच आलं नाही की आपण अंगठी गिळतो आहोत तिला वाटलं की आपण विचित्र स्वप्न पाहतो आहोत. याबाबत या मुलीने एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे आणि ती चांगलीच व्हायरलही होते आहे. अमेरिकेतल्या सँडिएगो या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. जेना इव्हान्स असं या तरुणीचं नाव आहे. १३ सप्टेंबरला तिने यासंदर्भातली पोस्ट तिच्या फेसबुक पेजवर लिहिली आणि त्यानंतर ती पोस्ट व्हायरल होते आहे. या फोटोत या तरुणीने तिची साखरपुड्याची अंगठी पोटात असल्याचा एक्स रे आणि स्वतःचा रुग्णालयातला फोटो पोस्ट केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये जेनाने काय म्हटलं आहे?
“तुम्ही कदाचित हे वाचलं नसेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी माझी साखरपुड्याची अंगठी झोपेत गिळली. मला वाटलं की मी काहीतरी विचित्र स्वप्न पाहते आहे. मला हे वाटत होते की माझी अंगठी माझ्या हाताच्या बोटात आहे. बुधवारी सकाळी मी झोपेतून उठले तेव्हा माझ्या हाताच्या बोटात साखरपुड्याची अंगठी नव्हती. मी माझ्या बॉयफ्रेंडला म्हणजेच बॉबला फोन केला आणि घडला प्रकार सांगितला. त्याला बहुदा सुरुवातीला मी काय बोलते आहे त्यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर मी माझ्या आईला हा प्रकार सांगितला. हा प्रकार जेव्हा मी आईला सांगितला तेव्हा आम्हा दोघींनाही हसू आवरत नव्हतं. डोळ्यातून पाणी येईपर्यंत आम्ही हसलो. त्यानंतर मी रुग्णालयात गेले तिथे डॉक्टरांनी माझा एक्स रे काढला. त्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले कारण मी अंगठी गिळल्याचे एक्स रे वरुन स्पष्ट झाले होते. माझ्या पोटात अंगठी होती हे एक्स रे ने दाखवले. आता पुढे काय करायचे हा विचार मी करत होते तेव्हाच तिथे बॉबी आला. त्याने मला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेले.”

“डॉक्टरांनी मला अप्पर एंडोस्कोपीचा सल्ला दिला. डॉक्टर म्हणाले की तुम्ही चिंता करु नका तुमच्या पोटातली अंगठी बाहेर काढली जाईल मात्र त्याआधी या फॉर्मवर सही करा. एंडोस्कोपी करताना तुमचा मृत्यू वगैरे झाला तर आम्ही जबाबदार नसू असा आशय या फॉर्ममध्ये आहे असे त्यांनी मला सांगितले. मी सही केली खरी पण त्यानंतर मला रडू फुटले. मी अंगठी गिळून वेडेपणा केला असे मला वाटले. कारण बॉबशी लग्न करण्यासाठी मी कितीतरी दिवस वाट पाहिली होती. मात्र बॉबने मला धीर दिला. त्यानंतर मला डॉक्टरांनी अॅनास्थेशिया दिला. मी गाढ झोपले सगळे काही छान झाले. डॉक्टरांनी अखेर माझ्या पोटातून अंगठी बाहेर काढली आणि माझा जीव भांड्यात पडला ”

या आशयाची पोस्ट या तरुणीने फेसबुकवर शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच हजारो वाचकांनी ही पोस्ट रीशेअरही केली आहे.