आजकाल आपण अनेक गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असतो. परंतु त्याचं बिल आलं की ते कसं भरायचं इथपासून तारेवरची कसरत सुरू होती. असाच पयाखालची जमिन सरकवणारा प्रकार नुकताच चीनमध्ये घडला. आपल्या क्रेडिट कार्डचं बिल भरूनही पोलिसांनी एका महिलेला अटक केली. त्यामागचं कारणही तसंच होतं. एका महिलेनी क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी आपल्या जुळ्या मुलांना तब्बल 65 हजार युआन म्हणजे साडेसहा लाखांना विकलं. या पैशातून त्या महिलेने क्रेडिट कार्ड बिल तर भरलंच, पण आपल्यासाठी एक नवीन मोबाइलदेखील विकत घेतला. या घटनेची माहिची मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला अटक केली.

डेली मेल आणि चीनच्या निंग्बो इव्हिनिंग न्यूझने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 20 वर्षीय महिलेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्याने तिच्या कुटुंबीयांनी मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. तसंच मुलांच्या जन्माच्या वेळी त्या जुळ्या मुलांचे वडिल रुग्णालयात आले नाही. त्यानंतर महिलेवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि तिने या जुळ्या मुलांना विकण्याचा निर्णय घेतला.

त्या मुलाच्या वडीलांना याची माहिती मिळताच त्यांनीदेखील यातून मिळणारे पैसे मागितले. सदर व्यक्तीलाही जुगार खेळण्याची सवय असून त्याच्यावरही कर्जाचा डोंगर उभा आहे. परंतु  महिलेने आपण ते पैसे खर्च केल्याचे त्याला सांगितलं. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या पार्टनरला अटक केली. तसंच त्या महिलेने जुळ्या मुलांना विकलेल्या कुटुंबांनाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी ती मुलं परत केली. पोलिसांनी त्या जुळ्या मुलांना सांभाळ करण्यासाठी सदर महिलेच्या आई वडिलांकडे सोपवलं. दरम्यान, या प्रकरणी त्या महिलेला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.