कलम ३७७ बाबत सध्या देशभरात चर्चा होते आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. अशात एका महिलेने आपल्या पतीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पती मुख मैथुनासाठी (Oral Sex)जबरदस्ती करत असल्याचा आरोप तिने केला आहे. मुख मैथुन अनैसर्गिक आहे त्यामुळे त्यासाठी दबाव टाकणे गैर आहे असेही तिने आपल्या याचिकेत म्हटले आहे. महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत जस्टिस एन. व्ही रामना आणि एम. एम. शांतनागौदर यांनी या महिलेच्या पतीला नोटीस जारी केली आहे. या महिलेच्या वतीने वकील अपर्णा भट यांनी कोर्टात बाजू मांडली. तसेच कलम ३७७ अंतर्गत पतीला शिक्षा व्हावी अशीही मागणी या महिलेने केली आहे.

या महिलेचा पती डॉक्टर आहे. २०१४ मध्ये या महिलेचे लग्न झाले, त्यानंतर पती कायमच मुख मैथुनासाठी दबाव टाकतो अशी तक्रार या महिलेने केली आहे. या महिलेचा पती तिला येणाऱ्या अडचणी, तिला होणारा त्रास याचा काही विचारच करत नाही. पती या जबरदस्तीवरच थांबला नाही तर त्याने याचा व्हिडिओही तयार केला आहे असाही आरोप महिलेच्या वकिलांनी केला. पतीच्या दबावाखाली या महिलेला आत्तापर्यंत वारंवार झुकावे लागले आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेच्या पतीने तिला मारहाण केली आहे असेही वकिलांनी कोर्टात सांगितले..

पीडित महिलेने तिच्या डॉक्टर पतीविरोधात अप्राकृतिक शरीरसंबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी आणि बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. त्यानंतर तिचा पती ही एफआयआर रद्द करण्यासाठी पोहचला. गुजरात हायकोर्टाने कलम ३७५ नुसार मॅरिटल रेपसंदर्भात काहीही तरतूद नसल्याचे म्हटले. या सगळ्यानंतर या महिलेने सुप्रीम कोर्टात न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली आहे..