आसाराम बापू याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणारी ३३ वर्षीय विवाहित महिला तिचा मुलगा व पतीसह रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
पीडित महिला आठवडय़ापासून बेपत्ता आहे. तिचा पती आणि मुलगाही गायब आहे, असे पोलीस उपनिरीक्षक एन. एम. अहिर यांनी सांगितले. महिलेच्या संरक्षणासाठी चार पोलीस शिपाई देण्यात आले होते. १४ डिसेंबर रोजी पीडित महिलेने आमरोली परिसरात एका लग्नसोहळ्याला हजर राहण्यासाठी जात असल्याचे पोलिसांना कळवले आणि त्या भागात आपल्याला पोलिस संरक्षणाची गरज नसल्याचे स्पष्ट केले, असे अहिर म्हणाले.
याच वेळी चारही पोलीस कर्मचारी पीडित महिलेच्या घराबाहेर पहारा देऊन होते; परंतु महिलेसह तिचा पती आणि मुलगा तिथे परतले नाहीत.
 त्यानंतर पोलिसांनी १८ डिसेंबरला पीडित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.
काही दिवसांनी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता १४ डिसेंबरला आमरोली भागात पीडित महिलेच्या कोणत्याही नातेवाईकाचे लग्न नसल्याचे निदर्शनास आले. महिलेचा मोबाइल बंद आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे; परंतु शोधकार्य हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले.