तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानच्या जेलमधून सुटका होऊन काही दिवसांपूर्वीच भारतात परतलेल्या हसीना बेगम यांचं मंगळवारी (9 फेब्रुवारी) निधन झालं. पाकिस्तानातून परतल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच हसीना यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी झोपेत असताना हृदय बंद पडल्याने (cardiac arrest ) त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी औरंगाबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. औरंगाबादमधील रशीदपुरा येथील रहिवाशी असलेल्या हसीना बेगम यांचा उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील दिलशाद अहमद यांच्याशी विवाह झाला होता. पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी १८ वर्षांपूर्वी त्या पाकिस्तानच्या लाहोरला गेल्या होत्या. पण, पासपोर्ट चोरीला गेलेल्या हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती.

त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने तब्बल 18 वर्षांनंतर त्यांची जेलमधून सुटका झाली होती. 26 जानेवारी 2021 रोजी त्या औरंगाबादला परतल्या. पण पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर अवघ्या अवघ्या 15 दिवसातच हसीना यांचा मृत्यू झाला.