हनीमूनला जाताना मुलगी स्वत:च्या आईला बरोबर घेऊन गेली. मात्र फिरायला तिथे जावई आणि सासुचेच सूत जुळलं आणि मुलीला आपल्या १५ वर्षांच्या संसारावर पाणी सोडावं लागलं. एखाद्या चित्रपटाची कथा वाटणारी ही घटना घडली आहे लंडनमधील ट्विकेनहम येथे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार ट्विकेनहममधील ३४ वर्षीय लुरेन वॉल या तरुणीने वयाच्या १९ व्या वर्षी पॉल व्हाइट या तरुणाशी लग्न केलं होतं. अनेक वर्षांपासून एकत्र असणाऱ्या लुरेन आणि पॉलला हनिमूनला जाता आले नव्हते. त्यामुळेच लुरेनची आई जुली हिने १५ हजार पौंड (अंदाजे १४ लाख रुपये) दिले. आईने मदत केल्याने लुरेन पॉलबरोबर हनीमूनला जाताना आईला घेऊन गेली. दोन आठवड्यांच्या सहलीसाठी हे तिघेजण डीव्होन येथे गेले होते. या सुट्टीवरुन परत आल्यावर आठ आठवड्यानंतर पॉल घर सोडून गेला. त्यानंतर नऊ महिन्यांनी जुली यांनी एका मुलाला जन्म दिला. आपल्या आयुष्यात काय सुरु आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या लुरेनला तिच्या आईने, “मी आणि पॉल एकत्र राहत असून सहलीदरम्यान आमची जवळीक वाढली,” अशी कबुली दिली. तसेच जन्माला आलेले बाळ हे पॉलचेच असल्याचेही तिने लुरेनला सांगितले. हे सर्व ऐकून लुरेनला धक्काच बसला. हे सर्व प्रकरण २००४ साली घडले असले तरी याचा खुलासा लुरेनने आता केला आहे.

“पॉल आणि आईचे एकमेकांशी चांगले नाते होते. या दोघांमध्ये काही वेगळं घडत असेल असं मला वाटलंही नव्हतं. ते दोघे एकमेकांची खूप मस्करी करायचे. हसायचे. यात मला काहीच वावगं वाटलं नव्हतं,” असं लुरेन सांगते. लुरेनबरोबर अनेक वर्ष एकत्र असलेला पॉल अचानक स्वत:चा फोन जपून वापरु लागला. एकदा लुरेनच्या बहिणीनेच आईचा फोन वापरताना त्यामधील पॉलबरोबरचे चॅट पाहिले आणि त्याबद्दल लुरेनला माहिती दिली. मात्र त्यावेळी जुलीने ‘माझ्यात आणि पॉलमध्ये तसं काहीच नाहीय वेडी आहेस का तू?’ असं म्हणत लुरेनचा प्रश्न उडवून लावली होती. “मी जेव्हा पॉलकडे याबद्दल विचारणार केली तेव्हा त्याला धक्का बसला. मी त्याला फोन दाखवण्यास सांगितला तेव्हा त्याने नकार दिला,” असं लुरेन सांगते. त्यानंतर काही दिवसांमध्येच पॉल आपल्या साखरपुड्याची अंगठी घरात ठेऊन लुरेनला आणि लग्नाआधीच झालेल्या सात महिन्यांच्या मुलीला सोडून निघून गेला. त्यानंतर पॉल हा आईबरोबर राहू लागल्याचे कळल्यावर लुरेनला धक्काच बसला.

“एखादी आई आपल्या मुलीबरोबर असं कसं वागू शकते मला कळत नाही. पॉल तर माझा पती होता पण माझ्या आईनेच मला धोका दिला. मी २००४ साली लग्न केलं त्यानंतर त्याच व्यक्तीशी माझ्या आईने पाच वर्षांनी म्हणजेच २००९ साली लग्न केलं. हे सर्व मला सहन होत नव्हते. त्यामुळे मी आईशी बोलणंही सोडून दिलं. तिने अनेकदा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मला तिने जे माझ्याबरोबर केलं त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळेच मी तिच्याशी बोलणे सोडून दिलं होतं,” असं लुरेनने डेलीमेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

आज पॉल आणि जुलीच्या लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. लुरेनलाही नवीन जोडीदार मिळाला आहे. मात्र “आईने आपल्याबरोबर जे केलं त्यामुळे माझ्या नात्यांवरील विश्वास उडाला आहे,” असं लुरेन आजही सांगते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman whose mum stole her husband says she can never forgive the betrayal scsg
First published on: 20-01-2020 at 15:59 IST