विवाहबाह्य संबंधातून महिलेने प्रियकराच्या मदतीने मिळून नवऱ्याची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपन दास असे मृत व्यक्तीचे नाव असून जमशेदपूर पोलिसांनी शनिवारी आरोपी महिला, तिचा प्रियकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली. तपन दास जमिनीच्या व्यवहाराचे काम पहायचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपन दास १२ जानेवारीपासून बेपत्ता होता. गुरुवारी रात्री बाराबंकी येथे त्याचा मृतदेह सापडला. विशेष तपास पथकाने दोन दिवसांच्या आत या हत्या प्रकरणाचा उलगडा करुन तपनची पत्नी स्वेता दास, तिचा प्रियकर सुमित सिंह आणि त्याचा साथीदार सोनू लाल या तिघांना अटक केली. आरोपींनी चौकशीमध्ये गुन्ह्याची कबुली दिली.

हत्या केल्यानंतर मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला व १३ जानेवारीला फ्रिजसह मृतदेह बाराबंकी येथे फेकून दिला अशी माहिती जमशेदपूर पोलिसांनी दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. १२ जानेवारीच्या रात्री तपन दारुच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नी स्वेता सोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

पतीबरोबर भांडण झाल्यानंतर स्वेताने सुमितला घरी बोलवून घेतले. सुमित सोनू लालसह तिथे पोहोचला. त्यानंतर तिघांनी मिळून गळा आवळून तपनची हत्या केली. कोणाला काही कळू नये यासाठी त्यांनी फ्रिजमध्ये तपनचा मृतदेह ठेवला. त्यानंतर रिक्षामधून तो फ्रिज बाराबंकी येथे घेऊन गेले. त्यांनी गर्द झाडी असलेल्या भागात तपनचा मृतदेह फेकून दिला आणि दुसऱ्या ठिकाणी फ्रिजची विल्हेवाट लावली.

तपन आणि स्वेताला आठ वर्षांची मुलगी आहे. तपनच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे नवरा-बायकोमध्ये सतत भांडणे व्हायची अशी माहिती तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. तीन महिन्यापूर्वीच स्वेताची फेसबुकवरुन सुमित बरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman with help of boyfriend kill her husband kept body in fridge
First published on: 22-01-2019 at 00:35 IST