महिलेचे शरीर हे पुरुषांसाठी खेळणं नाही, असे मत नोंदवत मध्य प्रदेश हायकोर्टाने गुरुवारी एका तरुणावरील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली. लग्न करणार नाही हे माहित असूनही त्या तरुणाने पीडित तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.

भोपाळमध्ये राहणाऱ्या राजीव शर्मा या तरुणावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. शर्माची भोपाळमध्ये राहणाऱ्या डान्स टिचरशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि त्यानंतर शर्माने तिला लग्नाची मागणी घातली. दोघांचे लग्न देखील ठरले होते. मात्र, शर्माच्या आईचा लग्नास विरोध होता. लग्न ठरल्यावर शर्माने तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. सुरुवातीला तरुणीने नकार दिला होता. मात्र, आता लग्न होणारच आहे, असे सांगत त्याने तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र, काही दिवसांनी त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी मार्च २०१७ मध्ये राजीवविरोधात गुन्हा दाखल झाला होता. राजीवने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. बलात्काराचा गुन्हा रद्द करावा, अशी त्याची मागणी होती.

न्या. सुशीलकुमार पालो यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लग्नाचे आश्वासन देऊन राजीवने पीडितेची शरीरसंबंधांसाठी संमती मिळवली, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. हायकोर्टाने निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना सांगितले की, ‘महिलेचे शरीर हे पुरुषांसाठीचे खेळणे नाही. तो स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महिलेच्या शरीराचा फायदा घेऊ शकत नाही. या प्रकरणातील तरुणाने हीन कृत्य केले असून तो शिक्षेसाठी पात्र असल्याचे हायकोर्टाने नमूद केले. लग्न करणार नाही हे माहित असूनही त्या तरुणाने पीडित तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.