वेठबिगारी करण्यास नकार दिल्याने एका दलित महिलेचे नाक कापल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असून राज्याच्या महिला आयोगाने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना गंभीर असून संशयित आरोपींविरोधात कारवाई करण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला दलित आहे. तिने वेठबिगारीस नकार दिला. त्यामुळे रागातून सवर्णाने तिला बेदम मारहाण केली आणि तिचे नाक कापले. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी सोमवारी पीडित महिला आणि तिच्या पतीला वेठबिगारीसाठी घरी येण्यास सांगितले. पण त्यास दोघांनीही नकार दिला. त्याचा या आरोपींना राग आला. त्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पतीला ती रुग्णालयात नेत होती. त्याचवेळी आरोपीने तिचे नाक कापले. या घटनेची माहिती पीडितेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना दिली. ही घटना गंभीर असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा लता वानखेडे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.