नवरा-बायकोमधील भांडणाची किंमत एक वर्षाच्या मुलाला चुकवावी लागली आहे. या प्रकरणात पत्नीवर पोटच्या मुलाला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या बैरसियामध्ये सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. आपल्याबरोबर भांडण झाले म्हणून पत्नीने मुलाला जाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप नवऱ्याने केला आहे. त्याने पत्नी विरोधात बैरसिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

बैरसियाच्या खुजाखेरी गावात राहणारा धर्मेंद्र वाल्मिकी (२६) शेतात मजूर म्हणून काम करतो. धर्मेंद्रचे आई-वडिल त्याच्यासोबत राहतात. धर्मेंद्रच्या पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या घरी जायचे होते. जे विदिशा जिल्ह्यात राहतात. तिने धर्मेंद्रला आई-वडिलांच्या घरी नेऊन सोडण्यास सांगितले होते. पण शेती कामात व्यस्त असल्यामुळे आपण काही दिवसांनी जाऊ असे धर्मेंद्रने सांगितले. त्यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले असे तपास अधिकारी सीएल यादव यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी कामासाठी आपण शेतात गेल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास वडिलांचा फोन आला. पत्नीने पॉलीथीनची पेटती पिशवी मुलाच्या पायांना लावली त्यामुळे मुलाचे पाय भाजल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा करण वेदनेने विव्हळत होता. त्याच्या पायावर फोड आले होते. त्याला आपण लगेच रुग्णालयात घेऊन गेलो असे धर्मेंद्रने तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने तिच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण घरात एका दुरुस्ती काम करण्यासाठी पॉलीथीनची बॅग पेटवली होती. त्यावेळी करण खेळता खेळता तिथे आला. त्याचे पाय बॅगवर पडल्याने तो जखमी झाला. पोलीस सदर प्रकरणी अधिक तपास करत आहेत.