नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेचा पती आणि मेहुणा यांना दिल्ली पोलीस दलातून निलंबित करण्यात आल्यानंतर चार महिन्यांनी पुन्हा कामावर घेण्यात आले आहे.

या दोघांचा निलंबनाचा आदेश मागे घेण्यात आला आहे. दोघांनाही गेल्या आठवडय़ात पुनस्र्थापित करण्यात आले आहे, मात्र त्यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशी अद्याप प्रलंबित आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (दिल्ली सशस्त्र पोलीस) सी. के. मैन यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. हा आदेश मागे का घेण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.

सर्वोच्च न्यायालयाची कर्मचारी म्हणून आपल्याला बडतर्फ करण्यात आल्यानंतर लगेच या दोघांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप या महिलेने तिच्या शपथपत्रात केला होता.

१० व ११ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीशांनी आपण जेथे नेमणुकीला होतो, तेथे त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात आपल्यासोबत लैंगिक चाळे केले आणि आपल्याला अयोग्य रीतीने स्पर्श केला, असा आरोप या महिलेने १९ एप्रिलला तिच्या २८ पानी तक्रारीत केला होता. या कथित घटनेनंतर आपली अनेक वेळा बदली करण्यात आली आणि २१ डिसेंबर २०१८ रोजी आपल्याला एका चौकशीच्या संबंधात सेवेतून निलंबित करण्यात आले, असाही दावा या महिलेने केला होता.

या महिलेच्या पतीने सरन्यायाधीशांच्या कार्यालयात शिवीगाळ केल्याबद्दल, तर तिच्या मेहुण्याच्या उच्छृंखल व्यवहाराबाबत असलेल्या पोलीस तक्रारीमुळे या दोघांविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असल्याचे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते. दोघांच्या निलंबनाच्या वेळेबद्दल विचारले असता, या दोघांविरुद्धची चौकशी आणि महिलेचे प्रकरण या दोहोंचा काही संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते.