News Flash

रणधुमाळीत महिला उमेदवार दुर्लक्षितच

यावेळीही विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व दहा टक्केही नसेल.

अहमदाबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लावलेल्या एका फलकावर डोक्यावर घुंघट घेऊन स्कूटरवरून निघालेल्या दोन स्त्रिया होत्या. राज्यात स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या फलकातून राजकीय पक्षाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही दिसत होता. १८२ विधानसभा जागांच्या या राज्यात यावेळी भाजपने केवळ ११ तर काँग्रेसने १० जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत असताना कोणता पक्ष किती मते घेईल याबाबत होत असलेले दावे-प्रतिदावे किती खरे ठरतील हे सोमवारी समजेलच मात्र एक बाब सूर्यप्रकाशाइतकी लख्ख आहे, ती म्हणजे यावेळीही विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व दहा टक्केही नसेल.

गुजरातच्या पश्चिम टोकाच्या पोरबंदरपासून मध्य गुजरातमधील अहमदाबाद आणि पुढे दक्षिणेकडे सूरतपर्यंत फिरताना राजकीय पक्षाशी संबंधित नेत्यांना, कार्यकर्त्यांना पुढच्या एखाद्या तालुक्यातील, शहरातील कोणा संबंधिताचा संपर्क क्रमांक विचारला की तिथल्या एखाद्या स्त्री कार्यकर्तीचा संदर्भ शोधायला सुरुवात होते. महिला असल्याने महिलेशीच बोलायला बरे पडेल, असा सल्लाही मिळतो.

आमच्या शहरात, गावात स्त्रिया सुरक्षित आहेत. मध्यरात्रीही रस्त्यावर अगदी सुरक्षित फिरू शकतात, असा दावा पुरुषांकडून केला जातो. मात्र सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचा सहभाग मात्र यथातथाच दिसतो. भर बाजारातही आपण ‘स्त्री नसलेल्या जगात’ वावरतो आहोत, असा अनुभव सूरतमध्ये आला. सूरतमधील घाऊक कपडा बाजाराच्या पन्नासेक बहुमजली इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर शौचालये आहेत, मात्र त्यावर ते स्त्रियांचे की पुरुषांचे असे नमूद करण्याची गरजच भासलेली नाही. सामाजिक जीवनातील हेच प्रतिबिंब दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवार यादीतही पडले.

या निवडणुकीत सर्व पक्ष, अपक्षांचे एकूण १८२८ उमेदवार उभे आहेत. त्यातील महिलांचे प्रमाण फक्त १२६ म्हणजेच सात टक्क्य़ांहूनही कमी. गुजरातच्या एकूण मतदारांपैकी ४८ टक्के मतदार महिला असताना त्यांचे हे प्रतिनिधित्व. भाजपच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या आनंदीबेन पटेल या राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्यासह चार महिला आमदारांना निवडणुकीचे तिकीट नाकारले गेले.

नेत्यांची सावध भूमिका

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणामुळे महिलांना प्रतिनिधित्व मिळत असले तरी विधानसभा, लोकसभा निवडणुकांवेळी दहा टक्के स्त्रियांनाही संधी मिळत नाही, असे राजकीय पक्षांच्या महिला प्रतिनिधी खासगीत मान्य करत असल्या तरी पक्षाच्या निर्णयाविरोधात उघडपणे बोलण्याचे टाळतात. साणंदमध्ये काँग्रेसने यावेळी पुष्पाबेन धाबी यांना उमेदवारी दिली आहे.महिलांचे प्रतिनिधित्व एवढे कमी का, असा प्रश्न अहमदाबाद ग्रामीणचे सरचिटणीस पंकजसिंह वाघेला यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, उमेदवार हा क्षमता पाहून दिला जातो. पुष्पाबेन धाबी या तालुक्याच्या महिला प्रमुख आहेत. जिथे सक्षम महिला आहेत, त्यांना उमेदवारी दिली गेली, असे वाघेला यांनी सांगितले. मात्र राज्यात सक्षम महिला एवढय़ा कमी कशा, यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

सूरतमधील भाजपच्या नेत्याने महिला उमेदवार कमी असल्याचे मान्य केले. मात्र आम्ही महिलांचा सन्मान करतो, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतो. भाजपने यावेळी महिला उमेदवारांना उभे केले नसले तरी महिलांसाठी काम करणाऱ्या उमेदवारांना उभे केले आहे, असे या नेत्याने सांगितले.

  • यावेळी भाजपने ११ महिलांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने केवळ १० महिलांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली.
  • एकूण १८२८ उमेदवार उभे आहेत. त्यातील महिलांचे प्रमाण फक्त १२६ म्हणजेच सात टक्क्य़ांहूनही कमी. गुजरातच्या एकूण मतदारांपैकी ४८ टक्के मतदार महिला असताना त्यांचे हे प्रतिनिधित्व इतके कमी आहे.
  • २०१२ मध्ये ९१ आणि २००७ मध्ये ८८ महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या होत्या. २०१२ मध्ये भाजपकडून १२ तर काँग्रेसकडून चार महिला आमदार झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:48 am

Web Title: women candidates are neglected in gujarat legislative assembly election
Next Stories
1 विशेष न्यायालयांना तातडीने निधी देण्याचा सरकारला आदेश
2 अमरनाथ गुंफेत मंत्रोच्चारांचे पठण, भजन करण्यावर निर्बंध नाहीत
3 गुजरात निकालावर संसदेचा नूर
Just Now!
X