केरळ विधानसभा निवडणूक; इच्छुक उमेदवारांची लगबग
विजयाची खात्री असलेल्या जागांपासून अनेक वर्ष वंचित ठेवण्यात आल्याने निराश आणि दुखावल्या गेलेल्या केरळमधील काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी आता सुरक्षित मतदारसंघात उमेदवारी देण्याची जाहीर मागणी केली आहे.
केरळमध्ये १६ मे रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्यासाठी पक्षाने उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली असतानाच ही मागणी करण्यात आली आहे.
विधानसभा आणि लोकसभेच्या गेल्या काही निवडणुकांमध्ये महिलांना विरोधी पक्षांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि पक्षासाठी कठीण मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती, असे पक्षाच्या महिला नेत्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. केरळ विधानसभेत सध्या केवळ एकच महिला आमदार आहे.
पक्षात अनेक महिला सक्षम उमेदवार असतानाही महिला विधानसभेत प्रभाव पाडू शकल्या नाहीत, कारण ज्या मतदारसंघात पक्षाचे प्राबल्य नाही तेथेच महिलांना उमेदवारी देण्यात आली होती, असे राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिंदू कृष्णा यांनी सांगितले. महिला उमेदवारांसाठी विजयाची खात्री असलेले २५ टक्के मतदारसंघ राखीव ठेवण्याची मागणीही त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

समान प्राधान्य देण्याची गरज
एके काळी काँग्रेस पक्षाने महिलांना प्राधान्य दिले होते, मात्र अलीकडे महिला नेत्यांना उमेदवारीत आवश्यक असलेल्या वाटय़ापासून वंचित ठेवले जात आहे, असेही त्या म्हणाल्या. पक्षाकडून आम्हाला नैतिक पाठिंबा मिळतो, मात्र त्याचे प्रतिबिंब जागावाटपामध्ये दिसले पाहिजे, त्यामुळे आम्ही २५ टक्के राखीव जागांची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.