महिला असलो तरी लष्करामध्ये कोणतीही भूमिका यशस्वीपणे पेलू शकतो. अतिशय आव्हानात्मक मोहिमांमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. या संयुक्त सरावामध्ये सहभागी झाल्यामुळे खूप चांगला अनुभव आणि विविध देशांमधील मैत्र लाभले, अशी भावना पुण्यामध्ये पार पडलेल्या संयुक्त लष्करी सरावातील सहभागी महिला अधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सरावामध्ये सहभागी झालेल्या नऊपैकी निवडक अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये पथकाचे नेतृत्व करण्याची संधी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांच्या रूपाने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याला मिळाली
होती. सोफिया कुरेशी म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेमध्ये मी अनेकदा सहभागी झाले आहे. कांगो येथील मोहिमेमध्ये मी एक वर्षभर होते. महिलांवर मोठय़ा प्रमाणावर होणारे अत्याचार थोपविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले होते. दोंदेमिरी येथील अनाथाश्रमातील मुलीला तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचविणे हा माझ्यासाठी सुखद आणि अविस्मरणीय अनुभव होता.
या सरावाच्या निमित्ताने भारतामध्ये आम्ही प्रथमच आलो. आम्हाला हा देश, येथील माणसांचा अगत्यशील स्वभाव, भारतीय खाद्यपदार्थ हे सारे आवडले. आम्ही आमच्याच देशांमध्ये आहोत अशीच धारणा होती, अशी भावना इंडोनेशियाच्या टीन टीन आणि अमेरिकन लष्करातील (यूस आर्मी) गिली यांनी व्यक्त केली.