पंबा, केरळ : येथील शबरीमलाच्या अय्यपा मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही १० ते ५० वयोगटातील महिलांना अजूनही प्रवेश नाकारण्यात येत असून मंदिर पाच दिवसांसाठी खुले झाल्यानंतर पाच ते दहा महिलांनी तेथे जाण्याचे केलेले प्रयत्न फसले आहेत.

सोमवारी प्रतिबंधित वयोगटातील आणखी एका महिलेने मंदिराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त निदर्शकांनी तिला माघारी जाण्यास भाग पाडले. मंदिराभोवती सुरक्षा कडक करण्यात आली असून पाळी येण्याच्या वयोगटातील आणखी काही महिला सोमवारी रात्री मंदिर बंद होण्याच्या अगोदर तेथे जाण्याचा प्रयत्न करतील.

बिंदू या दलित महिलेने शबरीमला मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंबा येथे जाण्याचा प्रयत्न केला. तेथून पाच कि.मी. अंतराचा कठीण प्रवास केल्यानंतर मंदिरात जाता येते.

केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ही महिला होती, तिच्यासमवेत पोलिसही होते पण बस पंबा येथे पोहोचण्याच्या बेतात असतानाच भाजप कार्यकर्ते व इतरांनी रस्ता अडवून तिला उतरण्यास भाग पाडले.

फेरविचार याचिकांवर सुनावणीची तारीख आज ठरणार

नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील फेरविचार याचिकांची सुनावणी केव्हा घेणार याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. एस. कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचाराबाबत दाखल याचिकांवर वकील मॅथ्यूज जे नेदुमपारा यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावर एकूण १९ याचिका दाखल झाल्या असून, त्यांची सुनावणी केव्हा करायची त्याची तारीख मंगळवारी जाहीर करण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले आहे.