21 February 2019

News Flash

महिलांचा जन्म फक्त पुरूषांना खुश करण्यासाठी नाही; ‘खतना’वर सुप्रीम कोर्टाचे परखड बोल

खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने बायकांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो असे म्हटले आहे. सोमवारी खतना या प्रथेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट केली. स्त्रियांचे आयुष्य फक्त लग्न करण्यासाठी किंवा नवऱ्याच्या सुखासाठी नसते असे म्हणत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. खतना या प्रथेवर बंदी आणावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रथेवर बंदी आणावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

लग्न करून संसार थाटणे याशिवायही महिलांच्या इतर जबाबदाऱ्या असतात. खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेसाठी मारक ठरले. तसेच आरोग्यासाठीही हानीकारक आहे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पतीला खुश करावे ही जबाबदारी फक्त महिलांचीच का? असाही प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. केंद्र सरकारनेही या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे. दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या अल्पवयीन मुलींबाबत केली जाणारी खतना ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा उल्लेख या याचिकेत आहे.

कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टना हात लावणे हा गुन्हा आहे. प्रथा असली तरीही या गुन्ह्याची संमती दिली जाऊ शकत नाही असे मत अॅडव्होकेट इंदिरा जयसिंह यांनी नोंदवले आहे. धर्माच्या नावाखाली महिलेच्या जननेइंद्रियांना हात कसा काय लावण्यात येतो असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने मागच्याच सुनावणीच्या वेळी विचारला होता. खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.

धर्माच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणे गुन्हा आहे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच या प्रथेवर बंदी आणली जावी या मताचे सरकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आल्याचेही केंद्राने म्हटले आहे. फर्स्ट पोस्टने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

First Published on July 30, 2018 6:43 pm

Web Title: women do not live only for marriage and husbands supreme court speaks against female genital mutilation