केरळमधील शबरीमला येथील अयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतर केरळमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यभरातून यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आज कोल्लम तुलसी या ज्येष्ठ अभिनेत्याने शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवे असे धक्कादायक मत व्यक्त केले आहे.

कोलाम येथील एका कार्यक्रमात बोलताना कोल्लम यांनी शबरीमाला संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळेस बोलताना त्यांनी अंत्यंत धक्कादायक व्यक्त केले. शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवे. त्यातील एक तुकडा दिल्लीला पाठवावा आणि दुसरा थिरुअनंतपूरममध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयात पाठवून द्यायला हवा अशा प्रक्षोभक विधान केले आहे. कोल्लम यांनी अशाप्रकारची धक्कादायक वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी काही प्रसंगी अशाप्रकारची वादग्रस्त विधाने केली होती.

सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.