चार वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत खंड पडू नये यासाठी मातृत्व न स्वीकारण्याचा सल्ला भारतीय हवाई दलाने लढाऊ वैमानिक म्हणून पहिल्यांदाच दाखल झालेल्या तीन महिला वैमानिकांना दिला आहे.
तथापि, हा सल्ला कायदेशीररीत्या बंधनकारक नसून, वैमानिकांच्या प्रशिक्षणावर परिणाम होऊ नये हे निश्चित करण्यासाठी हा सल्ला देण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.प्राथमिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर या वर्षी १८ जूनला या तीन महिला वैमानिकांचा लढाऊ तुकडीत समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर एक वर्षभर प्रगत प्रशिक्षण देण्यात येऊन जून २०१७ पर्यंत त्या लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रत्यक्ष उड्डाणाची सूत्रे हाती घेतील.
भारतीय हवाई दलातील लढाऊ श्रेणीत महिलांच्या प्रवेशाला ऑक्टोबर २०१५ मध्ये संमती दिल्यानंतर भावना कांत, मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी यांची प्रशिक्षणार्थी वैमानिक म्हणून निवड करण्यात आली होती.