नवी दिल्ली : भारतात कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभेद हा वेतनमानाबाबतही कायम असल्याचे जागतिक महिला दिनापूर्वी जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या महिलांना १९ टक्के कमी वेतन  मिळते.

‘मॉन्स्टर’च्या वेतन निर्देशांकानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये वेतनाबाबतची दरी विस्तारली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सरासरी ४६.१९ रुपये अधिक मिळतात.

वर्ष २०१८ मध्ये पुरुषांना ढोबळ ताशी पगार २४२.४९ रुपये मिळत होता. तर स्त्रियांच्या ताशी मेहनतान्याची रक्कम १९६.३० रुपये होती. अधिकतर क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन आहे, असेही याबाबतचे निरीक्षण सांगते.

‘मॉन्स्टर’च्या म्हणण्यानुसार, माहिती तंत्रज्ञान तसेच संबंधित क्षेत्रात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना २९ टक्के तर निर्मिती क्षेत्रात २४ टक्के अधिक वेतन आहे. आरोग्यसेवासारख्या क्षेत्रात महिलांची संख्या अधिक असतानाही पुरुष २१ टक्के वेतन अधिक मिळवितात. तुलनेत वित्तीय सेवा, बँक, विमा क्षेत्रात वेतनभेद अवघा २ टक्के आहे.

कामकरी स्त्री-पुरुषांमधील वेतन-दरी ही दशकभरापासून लक्षणीय राहिल्याचेही हे सर्वेक्षण सांगते. २०१७ मध्ये याबाबतची दरी ही काहीशी अधिक म्हणजे २० टक्के होती. ‘मॉन्स्टर’ने जाणून घेतलेल्या मतानुसार, ७१ टक्के पुरुषांनी तर ६६ टक्के महिलांनी वेतन तसेच कामाबाबत लिंगभेद कमी व्हायला पाहिजे, असे वाटते.