सौदी अरेबियात प्रथमच महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. महिलांवर फुटबॉल स्टेडियममध्ये जाण्यावर निर्बंध होते, ते तेथील राजवटीने अलीकडेच उठवले आहेत. महिलांना मोटार चालवण्यास व चित्रपटगृहात जाण्यास बंदी होती तीही उठवण्यात आली आहे. काल जेद्दाह स्टेडियममध्ये झालेला सामना पाहण्यासाठी महिला गॉगल व सैलसर बुरखा घालून आल्या होत्या. त्यांचा पोशाख पारंपरिक काळ्या रंगाचा होता. राजपुत्रे महंमद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी महिलांवरील अनेक निर्बंध उठवले होते. महिलांसाठी खुला करण्यात आलेला पहिला फुटबॉल सामना अल अहली व अल बतिन या दोन लीग क्लबमध्ये जेद्दाह येथे झाला. तेथील पर्ल स्टेडियममध्ये या महिला त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या, काही जणी एकटय़ाही आल्या.
महिला व पुरूष यांच्यादरम्यान काचा लावण्यात आल्या होत्या. त्यांना वेगवेगळे बसवण्यात आले होते. सलेह अल झियाजी यांनी त्यांच्या तीन मुलींना सामना पाहण्यासाठी आणले होते. माझ्या मुलींचा सामना पाहायला मिळणार यावर विश्वास बसत नव्हता. रात्री आठ वाजता सामना सुरू झाला. लामया खालेद नासेर या फुटबॉल प्रेमी युवतीने सांगितले की, फुटबॉलचा सामना पाहायला मिळाला ही अभिमानाची बाब आहे. याचा अर्थ आता आमचे भवितव्य उज्ज्वल आहे. शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक होता त्यात मूलभूत बदल दिसून आले, असे रूवाद्या अली कासेम हिने सांगितले.
गेल्याच आठवडय़ात महिलांना शनिवार व गुरुवारचे सामने पाहण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त रियाध येथे महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 2:57 am