देशात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु असली तरी यात महिला पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. १००० पुरुषांमागे केवळ ८५४ महिलांनी करोना प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये याहूनही वाईट परिस्थिती दिसून येत आहे.

केरळ आणि छत्तीसगढ ही दोनच राज्यं अशी आहेत की जिथे पुरुषांहून अधिक महिलांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. छत्तीसगढमधलं लिंग गुणोत्तर प्रमाणही जास्त आहे. १०१३ महिलांमागे १००० पुरुष असं हे प्रमाण आहे. पण लसीकरणाच्या बाबतीत मात्र हे प्रमाण जास्त दिसून येतं. छत्तीसगढमधल्या १०४५ महिलांमागे १००० पुरुषांनी करोना प्रतिबंधक लस घेतल्याचं चित्र आहे.
केरळमध्ये मात्र लस घेणाऱ्या महिलांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५२.२ टक्के आहे. म्हणजेच १०८७ महिलांमागे १००० पुरुषांची करोनाची लस घेतली आहे.

हेही वाचा- जगभरात ८ लशींचा बोलबाला!; करोना विषाणू रोखण्यासाठी ठरताहेत प्रभावी

लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी न करता येणं, स्वतंत्रपणे बाहेर न पडता येणं, पुरुषांवर किंवा घरातल्या इतरांवर अवलंबून असणं ह्या काही प्रमुख कारणांमुळे महिलांचं करोना प्रतिबंधक लस घेण्याचं प्रमाण कमी होत असावं असं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
मात्र, ज्या राज्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे, त्या राज्यांमध्ये ही लिंग असमानता कमी प्रमाणात आढळते. हिमाचल प्रदेशात देशातलं सर्वात जास्त म्हणजे ३८ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. लस घेतलेल्यांपैकी ५० टक्के महिलाच आहेत. तर राजस्थानमध्ये ३० टक्के लसीकरण पूर्ण झालं असून महिला लाभार्थ्यांची संख्या ४८ टक्के आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्र आघाडीवर! अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल अशा लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या राज्यांमध्ये ही असमानता अधिक दिसून येते. उत्तरप्रदेशात एकूण १२ टक्के जनतेचं लसीकरण पूर्ण झालं आहे. तिथलं लिंग गुणोत्तर जरी १०००: ९३६ असं असलं तरी लस घेतलेल्या महिलांची संख्या १००० पुरुषांमागे ७४६ इतकीच आहे. बिहारमध्येही अशीच परिस्थिती आहे. राज्यातलं अवघं १३ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. लिंग गुणोत्तर जरी १०००: ९२३ असलं तरी १००० पुरुषांमागे लस घेणाऱ्या महिलांची संख्या केवळ ८१० आहे.

हेही वाचा-‘करोनामुक्ती’साठी ग्रामपंचायती सरसावल्या!

म्हणजे जेव्हा १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल त्यावेळी आपल्याला या लिंग गुणोत्तराचं योग्य प्रमाण कळू शकेल. मात्र, या बाबतीतही एक अपवाद आहे तो म्हणजे जम्मू-काश्मीरचा. राज्यात ३२ टक्के लसीकरण पूर्ण झालं असलं तरी लस घेणाऱ्या महिलांची संख्या १००० पुरुषांमागे ७११ इतकीच आहे. देशाची राजघानी दिल्लीमध्येही १००० पुरुषांमागे केवळ ७२२ महिलांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे.