सासरी स्वच्छतागृह नसल्यामुळे मध्य प्रदेशातील २० वर्षीय महिलेने सासर सोडले असून स्वच्छतागृह बांधेपर्यंत सासरी न परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा पटेल या महिलेने घर सोडल्यानंतर पती मोहन पटेल याने तिला घरी परतण्यासाठी वारंवार विनंती केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शहापूर कुटुंब समुपदेशन केंद्राशी संपर्क साधला. समुपदेशन केंद्राच्या सदस्या रजनी गायकवाड यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी सीमाची समस्या ऐकून मोहनला घरात स्वच्छतागृह बांधण्याचा सल्ला दिला.

२०१२ मध्ये मोहनशी विवाह झाल्यापासून सीमाने घरात स्वच्छतागृह बांधावे अशी सातत्याने मागणी केली होती. मात्र, तिच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे तिने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. गेल्या १९ महिन्यांपासून ती माहेरी आहे. त्यानंतर मोहन तिला घरी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता. मात्र, सीमा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. गेल्या गुरुवारी दोन्ही परिवारातील सदस्यांनी समुपदेशन केंद्रात जाऊन दाद मागितली. समुपदेशन केंद्राने सीमाच्या बाजूने निर्णय देताना मोहनला स्वच्छतागृह बांधण्याचा सल्ला दिला.

पोलीस अधीक्षक राकेश कुमार जैन म्हणाले की, समुपदेशन केंद्राचा निर्णय स्वागतार्ह आहे. सर्वानीच स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची गरज आहे.