राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी केवळ पारंपारिक कपडेच परिधान करावेत, असा नवा फतवा तामिळनाडू सरकारने काढला आहे. या प्रकारामुळे वाद निर्माण झाला आहे.


तामिळनाडू सरकारने परिपत्रकाद्वारे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याबाबत आदेश काढला आहे. या आदेशात म्हटले आहे की, कामावर असताना महिला कर्मचाऱ्यांना साडी, सलवार कमीज किंवा दुपट्ट्यासह चुडीदार असे कपडे परिधान करण्यास परवानगी आहे. तर पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट, फॉर्मल पॅन्ट, वेश्टी (अर्थात लुंगी जे तमिळ संस्कृतीचं प्रतिकं आहे). किंवा कोणताही भारतीय पारंपारिक पोशाख परिधान करण्यास परवानगी आहे.

तामिळनाडू सरकारच्या या नव्या फतव्यामुळे महिलांना ट्राऊझर्स, जीन्स, टॉप यांसारखे कपडे कामावर येताना परिधान करता येणार नाहीत तर पुरुषांना टी-शर्ट, जीन्स असे कपडे वापरता येणार नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांकडून टीका केली जात आहे.

दरम्यान, सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंत्र्यांना अशा प्रकारे ड्रेसकोडची सक्ती नसताना ती केवळ कर्मचाऱ्यांनाच करण्यात आल्याने सरकारची ही दुटप्पी भुमिका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.