News Flash

ट्रम्प माझे भाऊराया…हरयाणातील महिलांनी पाठवली राखी

ट्रम्प यांच्यासाठी १,००१ राख्या रवाना

भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी दृढ व्हावे म्हणून हरयाणामधील एका गावातील महिलांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राखी पाठवली आहे. ट्रम्प यांना १,००१ राख्या पाठवल्याचे गावातील महिलांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी हरयाणातील मरोरा गावाचे नामकरण ‘ट्रम्प गाव’ असे करण्यात आले होते. तेव्हापासून हे गाव चर्चेत आले. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक संदेश म्हणून गावाला ट्रम्प यांचे नाव देण्यात आले होते. ‘सुलभ’ या स्वयंसेवी संस्थेने या नामकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिका दौऱ्यादरम्यान नामकरणाची कल्पना सुचल्याने ‘सुलभ’चे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी म्हटले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने हे नामकरण अवैध ठरवले होते. गावाच्या वेशीवरील ‘ट्रम्प गाव’ हे फलकही प्रशासनाने हटवले होते. आता हेच गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गावातील महिलांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राख्या पाठवल्या आहेत. रक्षाबंधन हा भाऊ – बहिणीचे प्रेम दर्शवणारा दिवस असतो. गावातील मुली आणि महिलांनी डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या राख्या तयार केल्या आहेत. ट्रम्प यांच्यासाठी १,००१ तर मोदींसाठी ५०१ राख्या तयार करण्यात आल्या आहेत. गावातील महिलांसाठी हे दोन्ही नेते मोठ्या भावासारखे आहेत. भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी या महिलांनी दोन्ही नेत्यांना राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला. या राख्या अमेरिकेला रवानादेखील झाल्या आहेत. तर मोदींना दिल्लीत जाऊन राखी बांधण्याचा गावातील महिलांची इच्छा आहे.

‘ट्रम्पदादांसाठी मी तीन दिवसात १५० राख्या तयार केल्या. मी राख्यांसोबत एक पत्रही त्यांना पाठवले आहे. ट्रम्प यांनी मोदींसोबत येऊन गावाला भेट द्यावी’ अशी विनंती केल्याचे गावातील १५ वर्षाच्या रेखाराणीने सांगितले. या गावाची लोकसंख्या फक्त १,८०० आहे. सुलभ या संस्थेने गावात ९५ शौचालय बांधले असून संस्थेतर्फे गावात विविध उपक्रमही राबवले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 7:10 pm

Web Title: women of haryana village send 1001 rakhis brother us president donald trump raksha bandhan
टॅग : Haryana,President
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लाल किल्ला’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
2 पाकिस्तानी दहशतवादाला चीनकडून खतपाणी: रामदेव बाबा
3 अबू दुजाना ‘लष्कर’चा नव्हे, ‘अल कायदा’चा दहशतवादी: झाकिर मुसा