सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामुहिकरित्या पोस्टकार्डद्वारे संदेश लिहिला आहे. या संदेशाद्वारे त्यांनी मोदींना इथे येऊन ‘चाय पे चर्चा’ घ्या आणि आमची ‘मन की बात’ ऐका असे आवाहन केले आहे.

या आंदोलक महिलांनी आता #TumKabAaoge हे नवे कॅम्पेन सुरु केले आहे. यामध्ये पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि जवळपासच्या नागरिकांचाही समावेश आहे. काल (शनिवार) इथल्या आंदोलनाचा ३६वा दिवस होता. यावेळी महिला आंदोलकांनी २ हजारांहून अधिक पोस्टकार्ड संदेश मोदींसाठी लिहिले आहेत. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत यातील संदेश लिहिले आहेत. ही पोस्टकार्ड्स सोमवारी पंतप्रधान कार्यालय आणि मोदींच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार आहेत.

या आंदोलनाबद्दल बोलताना हुमा नाझ नामक फॅशन डिझायनर आंदोलक महिला म्हणाली, “मला पंतप्रधानांना प्रथम एक गोष्ट विचारायची आहे. ती म्हणजे तुम्ही नेहमी ‘बेटी बचाओ’ अभियानाबद्दल बोलत असता. आम्ही देखील या देशाच्या मुली आहोत. आम्ही या ठिकाणी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करीत आहोत. मात्र, तुम्हाला आमच्या तक्रारी ऐकण्यामध्ये रस नाही का? आमच्याबद्दल आता खोटी माहिती पसरवली जात आहे की, आम्ही इथे पैशांसाठी आंदोलन करीत आहोत. आमचा सन्मान तुमच्यासाठी महत्वाचा नाही का?”

वहिदान नावाच्या एक ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलाही या ठिकाणी आंदोलनात झाली आहे. या महिलेने मोंदींना आवाहन करताना म्हटले की, “आपलं घर आणि घरची काम सोडून कोणीही इथं पैशांसाठी बसू शकणार नाही. मात्र, आम्ही इथे बसलो आहोत ते यासाठी की आमचेही म्हणणे ऐकले जाईल. पंतप्रधानांनी एकदा तरी आम्हाला भेट का दिली नाही? का ते इथे येऊन आम्हाला विचारत नाहीत की तुम्ही इथे कशासाठी आला आहात? कोणाच्या आदेशानं आणि कोणत्या मोहापोटी तुम्ही इथे आला आहात?”