सौदी अरेबियातील वादग्रस्त दहशतवादप्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार तेथील प्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्यां लुजैन अल-हॅथलौल यांना सोमवारी सुमारे सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. सौदी अरेबियातील हा कायदा अत्यंत संदिग्ध असल्याचा आक्षेप घेतला जातो.

हॅथलौल यांच्याविरुद्धचा खटला आणि त्या अडीच वर्षांपासून कारावासात असल्याबद्दल मानवाधिकार गट, अमेरिकेतील काँग्रेस आणि युरोपीय समुदायाचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून टीका झाली आहे.

हॅथलौल या सौदीतील काही मोजक्या महिला अधिकार कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तेथे महिलांना वाहन चालविण्याची अनुमती २०१८ मध्ये देण्यात आली. त्यापूर्वी वाहन चालविण्याच्या हक्कासाठी त्यांनी आवाज उठवला होता. तेथील महिलांच्या संचार स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या पुरुष पालकत्व कायद्यालाही त्यांनी विरोध केला होता.

हॅथलौल यांच्यावर सरकारने ठेवलेल्या आरोपांत बदल घडवण्यासाठी आंदोलन करणे, सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे आदींचा समावेश आहे. याप्रकरणी त्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने दोषी ठरविले. या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे.