महिलांना आपातकालिन स्थितीत त्वरीत मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. महिलांना कोणत्याही परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज या नवीन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. एकाच नंबरद्वारे महिलांना पोलीस, आरोग्य, अग्निशमन आणि इतरही हेल्पलाईनशी जोडता येणार आहे. याद्वारे केलेला कॉल इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरशी जोडला जाणार असून त्वरीत मदत मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

यासाठी स्मार्टफोन वापरणाऱ्यांना ११२ डायल करावे लागणार आहे. तर ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांनी ५ किंवा ९ हे बटण लाँग प्रेस करणे आवश्यक आहे. सरकारकडून हितासाठी जाहीर केलेल्या या सुविधांचा गैरवापर करु नका असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी या सुविधेच्या उद्घाटनाप्रसंगी केले आहे. या सुविधेची दिल्लीमध्ये चाचणी घेण्यात आली तेव्हा ४ लाख प्रँक कॉल असल्याचे समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आता ही सुविधा देशातील १८ राज्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दूचेरी, केरळ, दिव आणि दमण, दादरा-नगर हवेली, लक्षद्विप आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे.

यासाठी गृहमंत्रालयाने सी-डॅकचे सहाय्य घेतले आहे. या योजनेची चाचणी तीन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात प्रॅंक कॉल आल्याने तेव्हा ही सुविधा अयशस्वी झाली. त्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर ही सुविधा आता प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या सुविधेसाठी केंद्र सरकारला निर्भया निधीतून ३२१.६९ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.