महिलांवर अत्याचार वाढत आहेत ही बाब निश्चितच चिंतेची आहे. अशात महिलांनी आता काली मातेप्रमाणे स्वतःजवळ सुरक्षेसाठी तलवार बाळगायला हवी असे मत केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी मांडले आहे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी महिलांनी तलावर वापरली पाहिजे असे ते म्हटले. काही समाजकंटक जर त्यांचे घर उद्धवस्त करण्यासाठी आले किंवा या महिलांवर अत्याचार करण्यासाठी आले तर त्यांना या महिलांनी तलवारीने उत्तर दिले पाहिजे अशी मुक्ताफळे सुप्रियो यांनी उधळली आहेत.

काली मातेच्या हाती तलवार आणि खड्ग आहे. तिने वापरले आहे का? महिलांनी हातात तलवार घेतली तर त्या भीतीनेच समाजकंटक पळून जातील, तुम्हाला ती चालवण्याची वेळही येणार नाही असेही बाबूल सुप्रियो यांनी म्हटले आहे. कनकसा भागात झालेल्या एका जनसभेत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. सध्या या भागात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम होते आहे. इथले लोक त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत त्यांची भूमिका योग्य आहे. माझ्या वक्तव्यातून मला कोणाच्याही भावना भडकवायच्या नाहीत मात्र मला नारीशक्तीची जाणीव स्त्रियांना करून द्यायची आहे असेही सुप्रियो यांनी स्पष्ट केले. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. बलात्कार, विनयभंग, अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार आणि त्यांच्या क्रूर हत्या या घटनांमुळे देशातल्या विविध घटकांमध्ये चिड निर्माण झाली आहे. या घटनांचा सगळ्याच स्तरांतून निषेध झाला आहे. अशा सगळ्या स्थितीत महिलांनी आत्मरक्षणासाठी आणि कुटुंबीयांच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली पाहिजे असे वक्तव्य बाबूल सुप्रियो यांनी केले आहे.