महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा, असा सल्ला देतानाच काँग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. अशा नेत्यांना शेवटी कोणत्या तरी महिलेनेच जन्म दिला असेल, असे वादग्रस्त विधान भाजपाचे मध्य प्रदेशमधील आमदार पन्नालाल शाक्य यांनी केले आहे.

पन्नालाल शाक्य हे मुख्यमंत्री जनकल्याण योजनेच्या सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी बेताल विधान केले. महिलांनी फक्त संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. कारण काँग्रेसच्या काळात फक्त चुकीचे धोरण आखणाऱ्या नेत्यांचा जन्म झाला. शेवटी या नेत्यांनाही कोणत्या तरी महिलेनेच जन्म दिला, असे त्यांनी सांगितले. समाजात विकृती निर्माण करणारे आणि दुर्गूण असलेल्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. अशी मुलं मोठी होऊ देश आणि समाजाला भ्रष्ट करतात, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पूर्वी गरीबी हटाव, असा नारा दिला. पण देशातील गरीबी कमी झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.

पन्नालाल शाक्य यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी शाक्य यांनी मुलींबाबत वादग्रस्त विधान केले होते. मुलींनी जर प्रियकराचा नाद सोडला तर त्यांच्यावरील बलात्काराचे प्रकार होतील, असे त्यांनी मार्चमध्ये म्हटले होते.