सर्वोच्च न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी

केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये अलीकडेच प्रवेश केलेल्या दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून मंदिरामध्ये अहोरात्र सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधील रंजन गोगोई, न्या. एल. एन. राव आणि न्या. एस. के. कौल यांच्या पीठासमोर ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी गुरुवारी सदर याचिका मांडली. शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश केल्याबद्दल सासूने मारहाण केलेल्या महिलेने स्वत:सह दोघींना सुरक्षा देण्याची मागणीही सदर याचिकेद्वारे केली आहे.

सर्व वयोगटातील महिलांना कोणत्याही अडथळ्याविना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा असे आदेश सर्व संबंधित प्राधिकाऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आली आहे. ज्या महिला मंदिरामध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांच्यासह अन्य महिलांना भविष्यात सुरक्षा द्यावी, अशी मागणी करून या महिलेने आपल्या जीविताला धोका असल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा हा महिलांचा समानतेचा लढा म्हणून पाहिला जात आहे.